Monday, 30 March 2015

बांधवांनो मला तुमच्याशी थोडसं बोलायचंय...
धनगर समाज संघटन करण्यासाठी तुम्ही आम्ही झटतोय हे किमान व्हाटसप वरतून तरी दिसून येतय  पण प्रत्यक्षात काय परिस्थिति आहे याबद्दल मला काही कल्पना नाही बुवा...
खूप वर्षापासून पाहत आलोय या महाराष्ट्र राज्यात धनगर समाजाच्या सतराशे साठ संघटना आहेत. कोणी आमुक संघटना तर एखादी तमुक संघटना.... बांधवांनो या सर्व संघटनांचं उद्धीष्ट काय आहे ते  माझ्या धनगर समाजाला कळू द्यात तरी...  संघटनेच्या अध्यक्षांनी काय म्हणून संघटना तयार करण्याचं ठरवलं??? मग संघटनेची उद्धीष्टे तर असतीलच ना???
धनगर समाजाला एकत्रित करण्याचं उद्धीष्ट तर प्रत्येक संघटनेचं आहे. त्याव्यतिरीक्त धनगर समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढा देणं. धनगर समाजावरती अन्याय होत असेल तर त्यांच्या हाकेला धावून जाणं. धनगर समाजाची व्यथा विधानभवनात आणि संसदभवनेत मांडण्यासाठी धडपड करणं. सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात धनगर समाजाला प्रेरित करणं तसेच मार्गदर्शन करणं ...इ.  सर्व संघटनांची याव्यतिरीक्त काही उद्धिष्टं असतीलच अथवा नसतीलही.
पण या संघटना गाव पातळी तालुका पातळी आणि जिल्हा पातळीवर धनगर समाजासाठीच कार्य करतात कोणी धनगर समाजाच्या विरोधात करत नाही. आपण सर्वजण एकाच रक्ताची माणसं आहोत, धनगर समाजातील थोर महापुरुषांच्या जातीत जन्माला आलेल्या आपण औलादी आहोत याची जाणीव तुम्हा-आम्हाला आहेच, मग सर्व संघटनांचं आणि संघटनांच्या पदाधिकार्यांचं कार्य एकच आहे पण मार्ग मात्र वेगळे आहेत. अशा कितीतरी संघटना या महाराष्ट्रात उदयास आल्या आणि गेल्याही. मग तुम्ही काय साध्य करू इच्छिता हे समाजासमोर मांडणं गरजेचं आहे असं मला वाटतं..
आजपर्यंत आपण प्रस्थापितांनाच शिव्या देत आलोय पण आतातरी जरा अक्कल येवू द्या. धनगर समाजाचं विभाजन कोणी प्रस्थापित नेते करत नाहीत तर धनगर समाजातीलच स्वतःला हुशार समजणारे समाजबांधव धनगर समाजाचं विभाजन करताहेत. संघटना चालकांनी आपल्या उद्धिष्टांमध्ये सरळ उल्लेख केला आहे की धनगर समाजाला एकत्र करणे. पण संघटना चालक स्वतः या मुद्द्यावरती ठाम आहेत का??? धनगर समाजानं एकत्र व्हावं असं म्हणत असतानाच तालुका आणि जिल्हा पातळीवरील धनगर समाजातील संघटना कधी एकत्र आलेत का??? त्या त्या संघटनेतील समाजबांधव धनगरच आहेत की दुसरे कोणी आहेत.?? जर धनगरच असतील तर मग त्यांच्या विचाराशी तुम्ही सहमत का होत नाही??? एका संघटनेतील नेते व पदाधिकारी दुसर्या संघटनेतील नेत्यांशी व पदाधिकार्यांशी कधी संपर्क साधतात का??
या सर्व प्रश्नांचं उत्तर नकारात्मक येईल कारण,
त्या त्या संघटनेचे चालक दुसर्या संघटनेतील नेत्यांशी खुन्नसपणे वागतात, एखाद्या नेत्याबद्दल बोलायला लागलं की त्या संघटनेचं चालक म्हणतात की मला त्या संबंधित नेत्याबद्दल चांगलही बोललेलं आवडणार नाही आणि वाईटही... जर तुम्ही धनगर समाजातील नेत्यांचा (प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेल्या व्यतिरीक्त नेत्यांचा) आदर करत नसाल, सन्मान करत नसाल तर मग तुमच्या संघटनांचं पहिलंच उद्दिष्ट डळमळित झालं म्हणून समजा. तुम्ही जर राज्यपातळीवर एकत्रित पणे धनगर समाजाच्या हक्कासाठी चर्चा करू शकत नसाल लढू शकत नसाल तर मग त्या संघटनांमधूनच धनगर समाजाचं विभाजन होतंय आणि हीच गोम प्रस्थापितांच्या लक्षात आल्यामुळं धनगर समाजाच्या मतांचा फायदा त्या हरामखोर प्रस्थापितांना होतोय, याचा कधीतरी विचार करा.  मग धनगर समाजाच्या एकिकरणासाठी तुमची चाललेली उठाठेव व्यर्थच म्हणावी लागेल. धनगर समाजाला एकत्र आणायचे असेल तर त्या त्या संघटनेच्या पदाधिकार्यांनी स्वतः पेक्षा समाजाचा विचार करावा. जर तुम्हाला पदं महत्वाची वाटत असतील तर माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाचं नुकसान करू नका त्यांनातरी किमान एकत्रित येवून योग्य दिशा ठरवू द्या,
त्या त्या संघटनेतील नेत्यांनी एकमेकांचा आदर न करता वयाचं भान न ठेवता लहान असो अथवा मोठा, आरं तुरंची भाषा करून "मला त्याच्याबद्दल बोलल्यालं आवडत नाही मग चांगले असो अथवा वाईट" असं जर तुम्ही म्हणत बसला तर मग तुमची लायकी काय आहे ते आजच्या यूवा वर्गाला सांगायची गरज पडणार नाही. तुम्हाला जर एकमेकांत खुन्नस करत बसायचं असेल तर तसंच करत बसा पण लक्षात ठेवा तुमच्या पुढच्या शंभर पीढ्या सुद्धा सुधरणार नाहीत त्या पुढच्या पीढ्यापण खुन्नस करत बसतील आणि धनगर समाजाचं असंच विभाजन होत राहील. त्यासाठी  "आधीच मर्कट त्यात मद्य प्राशन केलं" अशी समाजाची दुरावस्था करू नका.
नाहीतर मग शेवटी सर्वजन म्हणताहेतच "धनगरी जत्रा अन् कारभारी सतरा"
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
         नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
       +917666994123
nitsanuse.blogspot.com

Wednesday, 25 March 2015

धनगर समाजाची अवस्था.,,

मला प्रसिद्धि पाहिजे किंवा मला समाजावरती माझा छाप पाडायचाय म्हणून मी लिहीत नाही. मला यामधून माझा स्वतःचा स्वार्थ साधायचा नाही. मला हे सर्व करायची गरज देखिल नाही मी कोणावरती अवलंबून नाही मला जे काय पाहिजे होतं ते सर्व माझ्याकडे आहे.
आज मी स्वाभिमानाने जगतोय कोणाच्या चहाच्या देखिल मिंद्यात पडत नाही.
मी समाजाला एकत्र करण्यासाठी मिळेल त्या वेळेत समाज प्रबोधन करतोय. कोणत्याही धनगर नेत्यांना शिव्या देवून मी स्वतःवरती रोष वाढवून घेत नाही. समाजानं आपलं नेतृत्व स्वतः केलं पाहिजे दुसर्यांच्या सांगण्यावरतून नव्हे.
मेंढ्यांचं नेतृत्व मेंढपाळानीच केलं तर मेंढ्यांचं रक्षण होईल पण तेच नेतृत्व जर लांडग्यांनी केलं तर मेंढ्यांचं भक्षण होईल. समाजाची सुद्धा अशीच अवस्था आहे जर धनगर समाजातील नेत्यांना धनगर समाजाचं नेतृत्व करायचं असेल तर त्यांनी लांडग्यांचं विचार मनातून काढले पाहिजेत. तिकडे लांडग्यांच्या गुहेत जावून प्रशिक्षण घ्यायचं, मेंढ्यांना कशी फूस लावून त्यांना लांडग्यांच्या दावणीला कसं ओढून आणता येईल याचा प्रयत्न प्रस्थापित नेते करत असतानाच धनगर समाजातील नेत्यांनी त्यांची पाठराखन करणं हा धनगर समाजबांधवांच्या पाठीत खंजीर खूपसण्यासारखाच प्रकार आहे.
धनगर समाजाचे खरे नेते कोण आणि धनगर समाजातील दलाल कोण याचा पर्दाफाश समाजबांधवांनी करून त्याची शहानिशा केलेली आहे. आजचा धनगर समाजातील यूवा वर्ग जागरूक झाल्यानं धनगर समाजासाठी झटणारा आणि झगडणारा नेता कोण हे सांगायची गरज पडणार नाही. समाजातील नेत्यांना जर दलाल म्हणवून घ्यायचं नसेल तर त्यांनी विचार करून त्या त्या पक्षातून राजीनामं देवून बाहेर पडा असंच आजपर्यंत सांगत आलोय लिहीत आलोय, पण त्या त्या  नेत्यांच्या समर्थकांकडून माझ्यावरती टीका केली जाते आहे की मी धनगर समाजातील नेत्यांना शिव्या देवून स्वतःची प्रसिद्धि करून घेतोय.
बांधवांनो धनगर समाजानं आणि धनगर समाजातील नेत्यांनी कुठंतरी एकत्रित यायला पाहिजे म्हणून माझ्यासारखेच कीतीतरी समाजबांधव यासाठी झटताहेत. डोळ्यांत तेल घालून लेखक/विचारवंत/अभ्यासक जीव तोडून तोडून समाजासाठीच लिहीताहेत पण त्याचा गैरसमज केला जातोय. समाजाच्या एकत्रिकरणासाठी कार्यरत असलेल्या समाज बांधवांवरती समाजविभाजन करतोय असे गंभीर आरोप केले जाताहेत. दुसर्यांचं झेंडे स्वतःच्या खांद्यावर वागवताना यांना लाज वाटत नाही पण स्वतःचं झेंडं खांद्यावर घ्यायला यांना लाज वाटतेय हे समाजासमोर मांडलं म्हणजे आम्ही त्यांना शिव्या देतोय असं समाजातील काही व्यक्तींना वाटतंय.
 धनगर समाजाला आरक्षण मागायच्या ऐवजी आमदारकी मागत असल्याचे आरोप कालच्या मोर्चातून झाले पण बांधवांनो जर आपलं हक्क मिळवायचं असतील तर नुसतंच बाहेरून लढून चालनार नाही तर विधानभवनात आणि संसदेत भांडता आलं पाहिजे. आजपर्यंत विधानभवनात आणि संसदेत धनगर समाजाच्या आरक्षणावरती बोलणारा आणि भांडणारा सक्षम हुशार अभ्यासक असा एकही सदस्य नव्हता म्हणूनच धनगर साजाचा ST आरक्षण अंमलबजावणीचा मुद्दा तसाच धूळ खात पडलाय...
पण विधानभवनात धनगर समाजाच्या हक्क्साठी भांडणार्या नेत्याला आडवण्यासाठी काही धूर्त लोकांनी धनगर समाजातील इतर नेत्यांचा खांद्यावर बंदूक ठेवण्यासाठी वापर करून घेतला आणि आजही करताहेत. मग त्या प्रस्थापित नेत्यांची धोतरं सांभळणार्यांना काय म्हणायचं ते समाज बांधवच ठरवतील....
जय मल्हार जय अहिल्या
        -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
      +917666994123
nitsanuse.blogspot.com

२३ मार्चचा मोर्चा..


अब्रुचे खोबरे व्हावे असाच काही उचित प्रकार आजच्या धनगर समाजाच्या ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी काढलेल्या मोर्चातून दिसून आला. आज धनगर समाजाला चारित्र्यसंपन्न नेतृत्वाची गरज असताना दुसर्यांच्या ईशारावरती नाचनार्या नेत्यांना आज धनगर समाजानं त्यांना त्यांची जागाच दाखवून दिली. कदाचित आरक्षणाऐवजी हेच त्या नेत्यांना सिद्ध करुन दाखवायचं होतं की काय?? हा प्रश्न मला पडलाय... बारामतीच्या मोर्चातून अख्ख्या महाराष्ट्राला धनगर समाजाची ताकद दिसून आली होती. अख्ख्या भारताचं लक्ष धनगर समाजानं केंद्रित करून घेतलं होतं, बारामतीचा मोर्चा हा अनपेक्षितपणेच होता, त्याचं काही आयोजनही केलं नव्हतं तरीही ५,००,००० (पाच लाखांवरती) त्याहून जास्त धनगर समाज स्वखर्चानं बारामतीमध्ये एकवटला गेला होता पण आजचा मुंबई विधानभवनावलील मोर्चा हा पूर्वनियोजित असताना, बारामतीकरांकडून दोन कोटी रुपयांची मदत असूनदेखिल ५०० ते ७०० (मी १०००मानून चालतो) इतकाच समाजबांधव आजच्या मोर्चाला उपस्थित होता. कीती दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल.
आजचा मोर्चा वक्रतुंडाच्या कृपेनं आयोजित केल्यानं धनगर समाजानं देखिल मोर्चाकडून तोंड वाकडं केलं.
यामध्ये धनगर समाजाचं काही नुकसान नाही झालं पण ज्यांन या मोर्चाचं आयोजन केलं होतं ज्यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं होतं त्या त्या रथी महारथींच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला तो म्हणजे राजकीय संन्यास घ्यायचा.
आज धनगर समाज जागा झालाय समाजामध्ये परिवर्तन घडतंय, विशेषता यूवा वर्ग जागरुक झालाय. आजपर्यंत डोंगर-दर्यातून माळरानावर शेळ्या-मेंढ्या राखणार्या अडाणी/अज्ञानी भोळ्या-भाबड्या माझ्या धनगर समाजाला फसवून लांडग्यांच्या दावणीला बांधायचं काम हे धनगर समाजातील नेते मंडळींनी केलं. शेता-मळ्यात बैलासारखं राब राब राबणार्या माझ्या शेतकर्यांना फसवायचं काम हे दलालांनी केलंय. त्यामुळे धनगर समाजाचे नेते कोण आणि समाजातील दलाल कोण हे आजच्या तरुन पीढीला सांगायची गरज पडणार नाही. आजचा मोर्चा हा धनगर समाजातील नेत्यांच्या विचाराने आणि पुढाकाराने आयोजित केला असता तर आझाद मैदानावर उभं राहायला जागा पुरली नसती. या मोर्चाचं आयोजन केल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं गेलं होतं तेव्हा त्याच्या दुसर्या दिवसी मी सांगितलं होतं की धनगर समाजातील नेत्यांना जर धनगर समाजाचं नेतृत्व करायचं असेल तर आपापल्या पक्षाचं राजीनामं द्या आणि पिवळा झेंडा खाद्यावर घेवून मगच तुम्ही धनगर समाजाचं नेतृत्व करा. जर त्या त्या नेत्यांनी राजीनामं दिलं असतं तर आज १५ लाखाच्यावरती धनगर समाज एकत्रित करण्याची जबाबदारी माझी होती असंही मी सांगितलं होतं. पण हा मोर्चाच बारामतीकरांच्या सांगण्यावरुन आयोजित केला होता त्यामुळं राजीनामं कोणाकडे द्यायचे तिथंच घोडं पेंड खात होतं.
संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करून धनगर समाजातील नेत्यांना आणि समाज बांधवांना आवातनं द्यायची वेळ ही बारामतीकरांवरती आली. हीच धनगर समाजाची ताकत आणि हाच विजय आहे. तुम्हाला धनगर समाजासाठी झटायचं असेल झगडायचं असेल तर धनगर समाजातल्या प्रत्येक नेत्यांना, होतकरूंना  आणि स्वाभिमानी तरूनांना विचारुनच तुम्ही समाजबद्दलचा निर्णय घ्या, समाजासाठीचा निर्णय हा समाजबांधवांनाच विचारून घ्या बारामतीच्या बोक्याला विचारून तुमचे प्रश्न सुटणार नाहीत उलट समस्या वाढत जातील त्यासाठी आजचा अनुभव आयुष्यभर तुमच्या लक्षात राहूद्या.
स्व.बी के कोकरे साहेबांचा राजकीय खून करून  माजी मंत्री स्व शिवाजीराव(बापू) शेंडगेना जवळ करुन धनगर समाजाचं नेतृत्व खुडून टाकायचं पाप बारामतीच्या बोक्यानं केलंय हे तुम्हीही नाकारु शकत नाही आणि आज मा.महादेवजी जानकर साहेबांचं वाढतं वर्चस्व रोखण्यासाठी धनगर समाजातील नेत्यांना फूस लावायचं राजकारण बारामतीचा बोका करतोय म्हणजे 'काट्यानं काटा काढायचा' हे उघड्या डोळ्यांनी सरळ सरळ दिसून येतंय. त्यांना फक्त जानकर साहेबांचीच भीती वाटतेय असं नाही तर संपूर्ण धनगर समाजाची त्यांना भीती वाटतेय म्हणूनच धनगर समाजाला एका नव्हे तर दोन दोन घोंगडीनं झोपू घाला असं म्हणणार्या यशवंतराव चव्हाणांची ही राजकीय औलाद आहे ते  विसरता कामा नये.
राजकारण आणि समाजकारण करायचं असेल तर चारित्र्यसंपन्न नेतृत्व तुमच्या अंगी असायला पाहिजे तरच समाज तुम्हाला सलाम करेल नाहीतर कोणाचेतरी बुट चाटायची सवय तुम्हाला असेल तर समाज तुम्हाला बुटाखाली घ्यायला मागंपुढं बघणार नाही.
तुम्हा सर्वांना माहीत आहेच की घरातील योग्य आणि चांगले निर्णय फक्त आईच घेवू शकते कारण बाजूची बाई मात्र संसारात विष कालवायचा प्रयत्न करते. म्हणून धनगर समाजानं आपली आई ओळखायला शिकलं पाहिजे जर बारामतीच्या बाईच्या नादाला लागाल तर आपल्या पुढच्या शंभर पीढ्या त्यांची धोतरं लुगडी सांभाळत बसतील म्हणूनच म्हणतो बांधवांनो आजतरी एकत्रित या अजूनही वेळ गेलेली नाही.
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
-नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
    +917666994123
nitsanuse.blogspot.com

Sunday, 22 March 2015

एक सत्य...

मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. मला  कोणावरती छाप पाडायची आहे म्हणून मी लिहीत नाही, मी काव्य करतो त्यातून मी काय तुम्हाला भुरळ पाडायची म्हणून करत नाही. पण मनात शल्य बोचतंय ते ज्यांनी आपल्या समाजाचं आजपर्यंत वाटोळं केलं आणि आज त्यांच्याच सांगण्यावरून मोर्चा काढला जातोय.
आदरणीय प्रकाश आण्णांनी  माझा बांध रेटलाय म्हणून मी मोर्चाला विरोध करतोय अशातला भाग नाही. मी काय कोणत्या बीजेपी वाल्यांची चमचेगीरी करत नाही.  किंवा कोणाच्या बापाचं मी काही खाल्लय म्हणून मोर्चाला विरोध करतोय अशातला विषय नाही. जे बीजेपी मद्ये नाहीत तेच दलाल आहेत असंही मी बोललो नाही, पण समाजासाठी त्या त्या पक्षाची दलाली सोडून समाजासाठी एकत्रित यावे म्हणून मी संघर्ष करतोय, झटतोय आणि झगडतोय.
आरक्षण आम्हाला पाहिजेच पाहिजे, मग ते आरक्षण कसं मिळवायचं ते पण आम्हाला चांगलंच माहीत आहे.
आज धनगर समाजाचा पुळका येतोय म्हणून तुम्ही मोर्चा काढत नाही तर धनगर समाजाच्या विश्वासास पात्र नसलेल्या पवारांचं राजकीय धोतर सांभाळायचं म्हणून तुम्ही मोर्चाचं नेतृत्व करताय पण त्या रथाचा सारथी दुसरा तिसरा कोणी नसून ६५ वर्षे धनगर समाजाचा विश्वासघात करणारे शरद पवार आहेत म्हणून आम्ही मोर्चाला विरोध करतोय.
मला फोन येवू लागले की सर्व धनगर नेत्यांना विचारलं होतं पण त्यांनी नकार दिला कारण ते सत्ताधारी आहेत. जानकर साहेबांनी पण नकार दिला असं मला ऐकायला मिळालं. धनगर समाजातील नेत्यांना न विचारता मोर्चाचं आयोजन केल्यानंतर जर तुम्ही धनगर समाजातील नेत्यांना आवातनं द्यायला जाताय म्हणजे "वरातीमागून घोडे" असंच म्हणावं लागल.
आणि बरोबर आहे जानकर साहेब या मोर्चाला नकार देतिलच कारण २५ वर्षापासून हा माणूस घरादाराचा त्याग करून समाजासाठी धडपडतोय त्यावेळी जानकर साहेब तुम्हाला दिसले नव्हते का?? माढा लोकसभा मतदारसंघात जानकर साहेब निवडणूक लढवत होते त्यावेळी वर्तमानपत्रातून आणि न्यूज चैनल वरतून बातम्या धडकायच्या की
"माढा मतदारसंघात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या विरोधात मा. महादेवजी जानकर साहेब निवडणूक लढत आहेत, जानकर साहेब हे एक धनगर समाजाचे नेते आहेत."
मग धनगर समाजाचा उगंच पुळका आणनारे त्यावेळी काय शेण खात होते का??? त्यावेळी तुम्हाला धनगर समाज आठवला नाही तर पवारांचं राजकीय धोतर सांभाळत बसला आणि आज तुम्हाला धनगर समाज  आठवायला लागला. नुसतंच व्हाटसप आणि फेसबुक वरतून विकासाच्या न् आरक्षणाच्या पोकळ बढाया मारणार्यांनो तुम्ही कधी या गोष्टीचा अभ्यास केलाय का??
समाज संघटन करायचं आहे तर मग ज्यांनी आजपर्यंत धनगर समाजाचा वापर करून घेतला आणि समाजाचं वाटोळं केलं त्या बारामतीकरांच्या सल्ल्यानं मोर्चा आयोजित करायचा अन् पुन्हा धनगर समाजातील नेत्यांना आमंत्रण द्यायचं हीच निर्णयप्रक्रिया आहे का?? त्याअगोदर धनगर समाजातील नेत्यांनी एकत्र बसून जर हा मोर्चा आयोजित केला असता तर आज लाखच काय १५ लाखाच्या वरती धनगर समाजाला मुंबई मध्ये आणलं असतं हे ओपन चैलेंज मी त्याचवेळी दिलं होतं.
मला काहीजण म्हणाले तुम्ही काय स्वतःला चाणक्य समजता का?? त्यांना सांगू इच्छितो की मी काय स्वतःला चाणक्य समजत नाही पण कोणत्याही ऐर्यागैर्याला न जुमानता चाणक्यासारखे माझेही विचार समाजासमोर मांडायचं धाडस मी करतोय.
मी धनगर समाजाचं विभाजन करतोय असंही माझ्यावरती आरोप होऊ लागले. नक्की समाजाचं विभाजन कोण करतंय याचा अभ्यास तुम्ही कधी केला आहात का?? आजपर्यंत धनगर समाजानं एकत्र यावं म्हणून मी संघर्ष करतोय. जर धनगर समाजाचं विभाजन होऊ द्यायचं नसेल तर त्या पक्षातील सर्व नेत्यांना सांगा की तुम्ही आपापले राजीनामे तुमच्या पक्षश्रेंष्ठीकडे द्या. आणि पिवळ्या झेंड्याखाली एकत्रित या तरच समाजाचं विभाजन न होता एकत्रिकरण होईल त्यावेळी तुम्ही माझ्या धनगर समाजाचं नेतृत्व करण्या लायक आहात. अन्यथा तुम्ही माझ्या धनगर समाजाचं नेतृत्व करु नका. आणि भोळ्या भाबड्या माझ्या धनगर समाजाला लांडग्यांच्या दावणीला बांधायचं पाप तुम्ही करू नका.
       -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
    +917666994123
nitsanuse.blogspot.com

गुपित उद्याच्या मोर्चाचं...

गुपित उद्याच्या मोर्चाचं...
बांधवांनो खूप दिवसांपूर्वीपासून मी सांगत आलोय  आणि आजही आवर्जून सांगतोय. उद्या दि.२३ मार्च २०१५ रोजी धनगर समाजाला ST आरक्षणाची आंमलबजावणी व्हावी म्हणून विधानभवनावर मोर्चा काढण्यात येतोय. हा धनगर समाज प्रणित मोर्चा नसून राष्ट्रवादी प्रणित मोर्चा आहे.
बांधवांनो हा मोर्चा म्हणजे समाजाविषयी तळमळ आहे म्हणून आयोजित केला नाही तर यामागे खूप मोठं राजकारण दडलय...
धनगर समाजातील वरिष्ठ नेते त्याचप्रमाणे जेष्ठ विचारवंत आणि वक्ते/लेखक सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार नाहीत आणि  मी सुद्धा या मोर्चामध्ये सहभाग घेणार नाही. आमचा उघडपणे या मोर्चाला विरोध आहे. आरक्षण आम्हाला हवं आहे पण धनगर समाजातील नेत्यांना डावलून बारामतीकरांच्या सांगण्यावरुन जर हा मोर्चा आयोजित केला जात असेल तर या मोर्चामध्ये आम्ही काय म्हणून सहभाग घ्यायचा.?? आम्ही काय समाजाचं दलाल नाही. आम्ही काय कोणाची भडवेगीरी अन् चमचेगीरी करत नाही.
हा मोर्चा समाजाच्या हितासाठी नाही, समाजाचा पूळका येतोय म्हणूनही नाही तर पाठीमागच्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजामुळे पवारांना एकप्रकारचा झटका बसला होता म्हणून भोळ्या भाबड्या धनगर समाजाला फसवून त्यांना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधायचं षडयंत्र रचलं जात आहे. ज्या राष्ट्रवादीने आजपर्यंत तुमच्या आमच्या पोटावरती पाय देवून राजकारण केलं आणि सत्ता हातातून गेल्यावर धनगर समाजाला फसवून आपल्या जाळ्यात कसं ओढायचं हा डाव पवारांनी आखला आणि शेंडगे, डांगे, वडकुते रूपनवर यांसारख्या नेत्यांचा (दलालांचा) वापर करून धनगर समाजाला आपल्याजवळ कसं ठेवता येईल या पवार नीतीचा वापर केला.
बांधवांनो मी पदरचं सांगतोय किंवा माझ्या खिशातलं सांगतोय यातला विषय नाही, तर खरोखर विचार करण्याजोगी गोष्ट आहे. हा मोर्चा धनगर समाजातील कोणत्याही नेत्यांच्या पुढाकाराने आयोजित केला नाही, मोर्चाचं नियोजन करताना मोर्चाचं आयोजन करताना बारामतीमध्ये  धनगर समाजातील कीती नेते उपस्थित होते?? आणि कोण कोण होते?? याचा जर विचार केला तर समजेल या मोर्चाची डाळ नक्की शिजतेय नेमकी कुठे...??"
पाठीमागे झालेल्या बारामती येथील आंदोलनाचा अभ्यास केल्यास तुमच्या लक्षात येईल की मा.महादेवजी जानकर साहेब हेच धनगर समाजाचं नेतृत्व करत होते. अभ्यासू आणि जिज्ञासु व्यक्तिमत्व तसेच त्यागी नेतृत्व असलेले मा.महादेवजी जानकर साहेब यांच्यामुळे धनगर समाज संपूर्ण ताकतीनिशी एकसंघ होऊन लढत होता.  जानकर साहेबांनी बारामतीतून पवार घराण्याला सुरंग लावत आपलं वर्चस्व निर्माण केलं आणि शरद पवारांना एक प्रकारचा धक्काच दिला आणि मग पवारांनी जानकर साहेबांचा धसकाच घेतला.
जर धनगर समाजाचं नेतृत्व करून जानकर साहेब पुढे आले तर राष्ट्रवादीला गबाळ गुंडाळावं लागेल या भितीपोटीच २३ मार्चचा मोर्चा शरद पवारांनी राष्ट्वादीमधील धनगर समाजातील चमच्यांना बारामतीला बोलावून आयोजित करण्याचं ठरवलं.
        स्व. बी के कोकरे साहेबांनी यशवंत सेनेची स्थापना करून धनगर समाजाला जागं केलं होतं. अखंड धनगर समाज बी के कोकरे साहेबाच्या नेतृत्वाखली एकत्र येत होता त्यामुळे बारामतीत शरद पवारांची गोची झाली होती आणि बी के कोकरे साहेबांचा खून करण्याचं पाप पवारांनी ओढावून घेतलं. तदनंतर यशवंत सेनेची धूरा मा. महादेवजी जानकर साहेबांनी सांभाळली आणि आज यशवंत सेना रासप मध्ये विलीन करुन जानकर साहेबांनी बारामतीमध्ये पुन्हा थैमान घातले आहे. जर जानकर साहेबांनी बारामती काबीज केली तर पवार घराण्याला रस्त्यावर यावं लागल हीच भिती शरद पवाराना वाटत आहे.
जानकर साहेबांचा बंदोबस्त कसा करायचा म्हणून पवारांनी जसं बी के कोकरे साहेबांच्या खूनानंतर धनगर समाज पेटून उठल म्हणून शिवाजीराव (बापू) शेंडगे यांनां जवळ केलं तसच जानकर साहेबांचं नेतृत्व पुढे येवू द्यायचं नाही म्हणून  प्रकाश शेंडगेंना जवळ करून धनगर समाजाला वरती येवू द्यायचं नाही हे कुटिल राजकारण शरद पवारांकडून केलं जातंय.
उद्याच्या मोर्चात सामील होणार्यांना माझा काही विरोध नाही पण जो मोर्चा धनगर समाजातील नेत्यांना विचारून आयोजित केला नाही तो धनगर समाजाचा मोर्चा कसं काय म्हणायचं??, अथवा धनगर समाजातील सर्व नेत्यांनी एकत्रित बसून जर मोर्चाचं आयोजन केलं असतं तर आम्ही बेधडकपणे मोर्चात सामील झालो असतो. जिथं धनगर समाजातील नेत्यांचा विचार केला जात नाही तिथं आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांची काय पर्वा करतील.
धनगर समाजातील बांधवांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की सत्ता असताना देखिल शरद पवारांनी धनगर समाजाला आरक्षणाचा हक्क मिळू दिला नाही ते पवार आज काय आम्हाला हक्क देणार आहेत ??? म्हणून त्यांची गुलामगीरी अन् चमचेगीरी सोडून द्या. ज्यादिवशी  धनगर समाजातील सर्व नेते एकत्रित बसून चर्चा करतील आणि आणि आंदोलनाची दिशा ठरवतील त्यादिवशी मी तर प्राणपणाने मोर्चात सहभागी होणार आहे अन् तुम्हीही व्हा.
जय मल्हार!! जय अहिल्या!!
            - नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
            +917666994123
  nitsanuse.blogspot.com

धनगर समाजाला प्रबोधनाची गरज...

आज मी तुमच्यासमोर एक जीवंत उदाहरण देऊ इच्छितो, कदाचित यामधून आजच्या पिढीला नक्कीच काहीतरी शिकायला मिळेल.
आज मी रिझर्व बैंकेजवळून सी एस टी कडे निघालो असताना अचानक मी पाहिले की एका विजेच्या खांबाखाली जेमतेम १९-२० वर्षीय तरुणी वहीमध्ये काहीतरी लिहीत बसलेली होती. फोर्ट मार्केट मुंबईचा भाग असल्याने प्रथमता मला असे भासले की ती बिलाचा हिसाब करत बसली असावी. पण थोड्या जवळून पाहिले असता असे लक्षात आले की ती बिल/हिशोब वगैरे काही नाही तर UPSC चा अभ्यास करत होती.
मला आश्चर्य वाटले की जुन्या मुंबई सारख्या ठिकाणी त्याचप्रमाणे सतत वर्दळ असलेला फोर्ट मार्केट मुंबईचा हा भाग, येथे विज-पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना देखिल अभ्यासासाठी फुटपाथ वरती का बसावे लागते?? मी मनाशीच विचार करू लागलो, का गरज पडली त्या मुलीला फुटपाथ वरती बसून विजेच्या खांबाखली अभ्यास करायची??
मी तिला विचारले असता तिने आत्मविश्वासाने सांगितले की "मला IAS व्हायचंय" तिचं हे उत्तर ऐकुण मी हैरान झालो अन् तिला "व्हेरीगुड मे गॉड ब्लेस यू " असे म्हणून गप्पच बसलो. कारण माझ्या गप्प बसण्याला एक कारण होतं ते म्हणजे त्या मुलीचे बैकग्रॉउंड...
त्या मुलीचं म्हणजेच प्रतिज्ञाचं कुटूंब फुटपाथ वरतीच कित्येक दिवसापासून  राहत आहे. तिचे वडिल सकाळी सकाळी दुसर्यांच्या गाड्या (कार) धुवायचे काम करतात तसेच दिवसभर वेगवेगळ्या हॉटेल मध्ये पाणी वाहायचं आणि शे दोनशे रूपये कमवायचे ही त्यांची रोजची दिनचर्या. तर ती मुलगी आई सोबत इतरांची धुणी-भांडी करून जेमतेम ७०-८० रुपये कमवते आणि रात्री मिळालेल्या वेळेत रस्त्यावर रहद्दारी असताना देखिल त्याकडे दुर्लक्ष करत अभ्यासावर लक्ष केंद्रित करून तिचे भविष्य गिरवत बसतेय. त्या भावी IAS अधिकारी प्रतिज्ञा ला एक सलाम करत तिला घवघवीत यश मिळवण्यासाठी शुभेच्छा देवून मी तिथून निघालो पण डोक्यात चाललेली विचाराची चक्रं मात्र काही केल्या थांबत नव्हती.
अरे आजच्या एकविसाव्या शतकात देखिल डॉ. बाबासाहेबांचे विचार मनात साठवून तोच संघर्ष तीच जिद्द चिकाटी आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवणार्या कीतीतरी व्यक्तींची उदाहरणे देता येतील. मग यामध्ये माझा धनगर समाजच का मागे पडतोय.??? माझ्या समाजात "ऐसा माय का लाल कोई पैदा क्यूँ नही होता??. खोटी कारणं सांगूण टाळाटाळ करणारी लोकं समाजात खूप प्रमाणात पाहायला मिळताहेत. सकारात्मक विचार करण्याऐवजी नकारात्मक विचार करणारे बहाद्दर देखिल माझ्याच समाजात कसे काय जन्माला येतात?? (उदा: आंब्याच्या करंडीत एखादा आंबा जर सडलेला असेल तर आख्खी करंडी सडून जायला वेळ लागत नाही) तसंच माझ्या समाजाचं देखिल झालय. म्हणूनच समाजाला प्रबोधनाची गरज भासतेय.
आजच्या पिढीतील शाळकरी विद्यार्थ्याला जर विचारले तुला काय बनायचंय तर सरळ सरळ उत्तरं येतात ती पुढीलप्रमाणे -'माहीत नाही', 'अजून तसे काही ठरवले नाही', 'पुन्हा सांगतो', 'बघू नशिबात जे असेल ते..' अशी उत्तरं ऐकुण माझी जाम सटकते.
समाजातील शिक्षित तरुन-तरूनींनी समाजातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे तसेच भविष्याच्या दृष्टिकोणातून आजच त्यांना लढाईसाठी समर्थन केल्यास आजची पीढी कधीच वाट चुकणार नाही. माझ्या भरकटलेल्या धनगर समाजाला कोणी जागं करायचा प्रयत्नच कोणी केला नाही इतकंच नव्हे तर धनगर समाजाला अजून योग्य दीशा मिळालीच नाही म्हणूनच माझा समाज अजून अंधारात गुरफटला आहे. जोपर्यंत ध्येयप्रेरित होऊन एखादं ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत नाही तोपर्यंत माझा समाज पुढे येणार नाही. ज्यादिवशी ध्येयवेड अंगीकृत करून समाजातील यूवकवर्ग योग्य दिशेने योग्य पाऊल टाकू लागला तर माझ्या धनगर समाजात IAS/IPS/ADVOCATES/DOCTORS/BUSINESSMAN यांची कमतरता भासणार नाही अन् त्यादिवशी भारताची प्रशासन यंत्रणा फक्त आणि फक्त धनगर समाजाच्याच हातात येईल.
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
       +917666994123
nitsanuse.blogspot.com

शिकलेल्या पोरास्नी म्हणावं....

शिकलेल्या पोरास्नी म्हणावं,
माघारी जरा फिरून बघ...
आडाणी असलेल्या मायबापाची,
विचारपूस तरी करून बघ...

खूप सोसल्या रे दुखाच्या झळया,
थोडसं जरा आठवून बघ...
सुकलेल्या त्या चेहर्यावरचं,
अश्रू डोळ्यांत साठवून बघ...

तळहाताच्या त्या फोडासारखा,
जपला रं तुला असा अलगद...
नाही कमी पडू दिलं रं गड्या,
पोटाची ती खळगी बडवत...

शिकला पाहिजे माझा पोरगा,
म्हणून चिंतातूर असे मायबाप...
काय म्हणून त्यांस विसरुन जावे,
उगाचि कशाला ओढावतोस पाप...

रक्ताचं ते नातं गड्या तुला,
नाही कळायचे सहजासहज...
ज्यावेळी होशील तु कोणाचा बाप,
त्यावेळी तुला येईल रं समज...
        - नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
  - +917666994123
www.nitsanuse.blogspot.com

धनगर समाजाची अवस्था...

आज धनगर समाजाची अशी अवस्था झाली आहे की सांगायला सुद्धा किळस वाटतोय. तुम्ही माना अगर न माना पण जणू काय मंदिरातील घंटा 'कोणीही या अन् वाजवून जा' असंच झालय माझ्या समाजाचं. खरं सांगितलं तर बरं वाटत नाही अन् बरं सांगीतलं तर खरं वाटत नाही मग खरंबरं करत करत कुरबूर व्हायला सुरवात होते हे मात्र नक्की.
ज्या समाजाला स्वतःच्या इतिहासाचा विसर पडलाय ते काय इतिहास घडवणार? अहो सळसळत्या रक्ताच्या आम्ही औलादी, पोलादी छाताडाची ढाल करून मनगटाच्या जोरावर तलवारीने सपासप वार करून दुश्मनांना चारी मुंड्या चित करणार्या धनगर समाजाच्या जातीत जन्माला आलेल्या महापुरुषांचे आम्ही वारसदार, एकेकाळी राजा समाज असणारी आमची जमात आज गुलामगीरीत जगतेय.
आरं शोभतंय का तुम्हाला?? आरं तुमचा इतिहास उलघडून बघा एकेकाची काळीजं चार्रकन चिरुन जातील असा सुवर्णाक्षरात कोरून ठेवलेला इतिहास माझ्या समाजासमोर मांडायचा जास्तीत प्रयत्न करा.
माझ्या धनगर समाजाची आजची अवस्था बघून माझ्या तळपायाची आग मस्तकापर्यंत जाते नसानसातून रक्त सळसळू लागते, डोळ्यासमोर माझ्या महारुषांचा इतिहास उभा ठाकतो, हाताच्या मुठी आवळल्या जातात पण "काश मेरे पास अगर तलवार होती तो... ?" असे शब्द नकळतच तोंडातून बाहेर पडतात.
म्हणून मला आज तलवाररुपी शब्दांचा वापर करावा लागतोय, आज माझ्या हातात जी लेखनी आहे ती एक जणू काय तीक्ष्ण धार असलेली माझी तलवार आहे. माझ्या महापुरुषांनी तलवारीचा वापर केला होता तो  आमच्यावरती अन्याय करणार्या दुश्मनांची डोकी कापायला केला होता पण मी आज शब्दरुपी तलवारीचा वापर माझ्याच समाजाची डोकी गीरवायला करतोय. मला माझ्या समाजाची डोकी नांगरायची आहेत, शेतीची मशागत करायची असेल जमिनीचा पोत वाढवण्यासाठी जमिन कसदार करावी लागते म्हणूनच समाजामध्ये स्वाभिमान निर्माण करायचा असेल तर आज मला धनगर समाजातील समाजबांधवांची डोकी नांगरावी लागतील तरच सक्षम, सतर्क आणि सुसंस्कृत समाज मला तयार येईल ही माझी दूरदृष्टी असून माझ्या समाजाला राजेशाहीचा थाट मिळवून द्यायचाय. म्हणूनच मी त्या दिवसाची वाट पाहतोय की "दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पिवळा फडकण्याची" त्याचदिवशी राजा सम्राट अशोकाचं राज्य आल्याचं सार्थक होईल नाहीतर गिधडांच्याच भितीनं आपल मरण वाचवत फिरायची वेळही दुर नसणार आहे. ज्या दिवशी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पिवळा फडकेल त्यादिवशीच पाणिपत मध्ये पराभूत झालेल्या मराठ्यांना अन् पाणिपतच्या मातीत रक्त सांडलेल्या शुरवीरांनाखरी श्रद्धांजलि मिळेल.  या युद्धात बिनबुडाचे आरोप माझ्या मल्हाररावांवरती झाले त्या आरोप करणार्या जातिवादी गिधडांना एकप्रकारची चपराक असेल. तो दिवस पाहण्यासाठी अन् माझ्या समाजावरती अन्याय करणार्यांच्या छाताडावरती थय्या थय्या नाचायचं माझं स्वप्न आहे त्यासाठीच मी लढतो आहे प्रसंगी मला रक्त सांडावं लागलं तरी बेहतर. मी कोणाच्या बांधीलकीत जगत नाही, आज मी ताठ मानेनं जगायला शिकलोय तुम्हीही ताठ मानेनं जगा नायतर तुमच्यावरती कोणीही थुंकायला अन् भुंकायलाही मागेपुढे पाहणार नाहीत.
उद्याच्या पीढीला जर कोणाच्या गुलामगीरीत जगू द्यायचं नसेल तर आज तुम्ही स्वाभिमानाने जगा एकत्र या अन् छाती ठोकून सांगा की मी धनगराची औलाद आहे. "वेळ आल्यास मरण पत्करेल पण कोणाला शरण जाणार नाही" हीच माझी नीती आहे.
 जर आज मला कोणी हाक दीली तर क्षणमात्रही विचार न करता मी त्याच्या मदतीला धावून जाईल कारण उद्या जर तीच वेळ माझ्यावरती आली तर मला कोणासमोर हात जोडायची गरज पडणार नाही त्यावेळी माझ्यावरती होणारे वार झेलायला माझेच शेकडो समाजबांधव ढालीसारखे उभे राहतील.
प्रत्येकाने जर हा विचार केला अन् तो आमलात आणला तर या देशावर फक्त आणि फक्त धनगर समाजच राज्य करेल ही दगडावरची रेषा आहे.
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
  - नितीनराजे अनुसे
  - अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
  - ७६६६९९४१२३
  - nitsanuse.blogspot.com

Saturday, 14 March 2015

एकत्र या परिवर्तन घडवायला..,

अरे समाज अजून कुठं जागा झालाय??
निघालाय इतिहास घडवायला....
आपल्याच महापुरुषांचा इतिहास विसरून,
लागलाय प्रस्थापितांची धोतरं बडवायला....

घरा-घरात अन् भावभावकीत भांडण लावून,
येताहेत प्रस्थापितच सोडवायला...
डोळ्यांवर अज्ञानाचं घोंगडं पांघरून म्हणतात,
हेच नेते आहेत आमचा विकास घडवायला...

लागेल  कोणाच्यातरी मनाला ठेस, मग
उठून उभा राहतील मलाच अडवायला...
कसला गर्व अन् कसला स्वाभिमान???
हे बसलैत एकमेकांचीच जिरवायला...

उद्याची पिढी तोंडात शेण घालेल,
जागा मिळणार नाही तोंड दडवायला...
म्हणूनच पिवळा झेंडा खांद्यावर घेवून,
एकत्र या परिवर्तन घडवायला
एकत्र या परिवर्तन घडवायला...
      -नितीनराजे अनुसे
     @ जागा हो धनगर
       +917666994123
www.nitsanuse.blogspot.com

Friday, 6 March 2015

झालय दुमत पाहिजे एकमत...

१८ मार्चच्या मोर्चाबद्दल दुमत झालय असं मला खुपजनांकडून ऐकायला मिळालं तर काहीजनांनी मला फोन करून विचारलं की नेमकं करायच काय???
【१】पहिलं मत असं की जर १८ मार्च रोजीचा जो मोर्चा आहे त्यात सहभागी झालो तर मी म्हणतोय असंच तो मोर्चा राष्ट्रवादी तर्फे आहे आणि  धनगर समाजाला माझ्याच समाजातील दलाल (तुम्हाला माहीतच आहे त्यामुळे मी त्यांची नावं घेत बसणार नाही) हे राष्ट्रवादीच्या दावणीला घेवून चाललेत.
【२】दुसरं मत असं की जर मोर्चामध्ये सहभागी नाही झालो तर तिथं धनगर समाजाची एकी दिसून येणार नाही.
मग नक्की काय करायचं ??? असाच प्रश्न समोर येतो, त्यावर मला विश्लेषण द्यायला आवडेल...
१)बांधवांनो पहिलं मत हे १००% बरोबर आहे कारण मोर्चाचं आयोजन हे प्रकाश आण्णा शेंडगेंनी केलंय. प्रकाश आण्णा शेंडगे सध्या राष्ट्रवादी मध्ये आहेत पण भाजप मध्ये आमदार असताना त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा कीती वेळा विधानसभेत मांडला होता. यावर विचारविनीमय करावा. खरंतर त्यावेळी कोंग्रेस आणि राष्ट्रवादीचेच सरकार होते. मग त्यावेळी प्रकाश शेंडगेंनी धनगर समाजाबद्दल कधी आवाज उठवला होता का?? राष्ट्रवादी आणि कोंग्रेसने या गोष्ठीची कीती शहानीशा केली होती??? पण २०१४ च्या विधानसभेसाठी अन्यवेळी भाजप मधून प्रकाश शेंडगेंचे तिकीट कापलं गेल्याने त्यांनी धुर्त आणि लबाड असलेल्या राष्ट्रवादीमद्ये प्रवेश केला.
प्रकाश शेंडगेंना देखिल माहीत होतं की धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कोंग्रेस आणि राष्ट्रवादीचा तीव्र विरोध आहे असे असताना देखिल प्रकाश शेंडगेंनी राष्ट्रवादीत का प्रवेश केला?? आण्णासाहेब डांगेदेखिल राष्ट्रवादीत आहेत, दत्ता मामा भरणे सुद्धा राष्ट्रवादीचेच..

२)मग दुसरं मत अशाप्रकारे आहे की जर मोर्चामध्ये सहभागी झालो नाही तर तिथं धनगर समाजात एकी दिसणार नाही.
समाजाची एकी असायला पाहिजे असं जर तुमचं मत असेल तर मग वेगवेगळ्या पक्षात स्वताची भाकरी भाजून घेणारे नेतेच एक होत नाहीत तर मग तुम्ही आम्ही सामान्य माणसं कशी काय एक होणार???
जर माझ्या धनगर समाजाचं नेतृत्व करायचं असेल तर सर्वांनी एकत्र येवून हा आरक्षणाबाबतचा मोर्चा यशस्वी करूयात. पण धनगर समाजातील नेते असे तसे एकत्र येणार नाहीत, कारण प्रत्येकजण स्वतःची कातडी वाचवायला बघतोय. काहीजन म्हणतात की ते स्वार्थासाठी करत नाहीत त्यांच्याकडे सात पिढ्या बसून खातील एवढी संपत्ति आहे. आणि ते आज फक्त आपल्या समाजासाठी लढताहेत.
माझं त्यांना सांगणं आहे की बाबांनो एवढी संपत्ति कमवायला तुम्ही कोणाच्या शेतात रोजगारानं गेला होता का??? जी तुम्ही संपत्ति कमवली आहे ती धनगर समाजाच्या नावाखाली कमवलीय समाजाची दलाली करून चमचेगीरी करून समाजाला बळीचा बकरा बनवून प्रस्थापितांच्या दावणीला बांधायचं पाप तुम्ही केलं त्यावेळीच तुम्ही सात पिढ्या बसून खातील एवढी संपत्ति कमवली. पण आजचा माझा धनगर समाज आयुष्यभर शेळ्या-मेंढ्या राखून, राब राब राबून सुद्धा त्यांचे कधी कधी खायचे वांदे होतात. मग तुम्ही एवढी संपत्ति कमवली कोठून??? समाज तिथंच राहिलाय फक्त नेते मोठे होत गेलेत.
तुम्ही जर स्वार्थासाठी समाजाचं नेतृत्व करत नसाल तर मग राजीनामं द्यायला काय होतंय???
तुम्हाला निस्वार्थीपणे लढायचं असेल तर मग प्रस्थापितांची चमचेगीरी दलाली सोडून तुम्ही पिवळ्या झेंड्याखाली का एकत्र येत नाही???
त्या त्या पक्षाचे राजीनामं का देत नाही???
असं काय दडलंय त्यात तुम्ही आपापल्या पक्षाला राजीनामं द्यायला तयार होत नाही???
वेगवेगळे झेंडे उरावर घेवून मिरवण्यापेक्षा महात्मा फुलेंनी दिलेला समतेचा पिवळा झेंडा घ्यायला तुम्हाला लाज वाटतेय का???
ज्यादिवशी तुम्ही सर्व नेते त्या त्या पक्षाचं राजीनामं देवून पिवळ्या झेंड्याखाली एकत्र याल त्यावेळीच तुम्ही  निस्वार्थीपणानं माझ्या समाजासाठी लढू शकता अन्यथा  माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाची फसवणूक करू नका.
आज एक उठून म्हणतोय आरक्षण पाहीजे उद्या दुसरा म्हणतोय परवा तिसरा असंच जर आरक्षण मागत बसला तर तुमच्या पुढच्या पिढ्यानपिढ्या आरक्षणाचीच भिक मागत बसतील.
राजीनामं न देता जर तुम्ही १८ मार्चला विधानभवनार जाल त्यावेळी तुमच्यासोबत ठरावीकच लाचार लोक मोर्चात सामील होतील...
आणि जर सर्व धनगर समाज एकत्रित आणायचा असेल तर त्यासाठी तुम्ही नेत्यांनी आजच एकत्र या पण असं तसं नव्हे स्वार्थ बाजूला ठेवून समाजाच्या हितार्थ  त्या त्या पक्षाचे झेंडे पायदळी तुडवा आणि राजीनामे देवून पिवळ्या झेंड्याचे मानकरी बना अन्यथा भंडार्याची शपथ माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाचं नेतृत्व करायच्या भानगडीत पडू नका.
आम्ही आमचं नेतृत्व स्वतः तयार करू....
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
       -नितीनराजे
@ जागा हो धनगर
(+917666994123)
(Facebook.com/jagaho.dhangara)
(nitsanuse.blogspot.com)
यावरती आपल्या प्रतिक्रिया कळवा...

Thursday, 5 March 2015

<शुरवीर महाराजाधिराज राजे यशवंतराव होळकर मला बोलले...

पहाटे पहाटेची वेळ होती, गाढ साखर झोपेत असताना अचानक कोणीतरी गालावर जोरदार चपराक मारण्याचा भास झाला, कोण कोण असं म्हणत गालावर हात फिरवत डोळे चोळत उठून बसतो तोच समोर एक आकृति दिसली. धिप्पाडच्या धिप्पाड शरीरयष्टी, अंगावर जरदारी रेशमी वस्त्रे परिधान केलेली, भरदार दाडी आणि कोरीव मिशा, डोक्यावर शिलेदार हिरेजडित टोप धारण केलेल्या व्यक्तिच्या डोळ्यात एकदम तेज निखार होता, कमरेला म्याणात तलवार लटकत होती. मी त्या व्यक्तिला ओळखलं तोच तोंडातून शब्द फुटले की महाराज तुम्ही?? आणि इथं कसं काय???
ती व्यक्ति दुसरी तिसरी कोणी नव्हती तर इंग्रजांविरुद्ध १६ लढाया जिंकणारे आणि पुण्याच्या पेशव्यांना ताणून ताणून मारणारे मुत्सद्दी लढवय्ये महाराजाधिराज शुरवीर राजे यशवंतराव होळकर होते.
मी केलेल्या प्रश्नाचं मला खडसावतच महाराजांनी उत्तर दिलं, "तिकडं माझा धनगर समाज डोळ्यांवरती अज्ञानाचं घोंगडं पांघरुन गाढ झोपी गेलाय त्या माझ्या धनगर समाजाला कोण जागं करणार???"
महाराजांना काय उत्तर द्यायचं मलाच सुचत नव्हतं. माझे ओठ पुटपुटत होते तेवढ्यात महाराज पुन्हा गरजले "काय दातखीळी बसली की काय?? मी विचारलेल्या प्रश्नाचं मला उत्तर हवंय...
मी बोललो की महाराज धनगर समाज अजून गाढ निद्रावस्थेत झोपी गेलाय ही गोष्ठ खरी आहे.आणि त्यांना जागं करायचा मी पुरेपूर प्रयत्न सुद्धा करतोय. पण काहीजन जागे आहेत त्यांनी मात्र झोपेचं सोंग घेतलंय. महाराज एक म्हणसुद्धा आहे की
"एकवेळ झोपलेल्यांना जागं करता येतं पण झोपेचं सोंग घेणार्यांना जागं करता येत नाही."
तेवढ्यात महाराज ओरडले "अरे झोपेचं सोंग घेणार्यांना लाथा घालून उठवायचं असतं, एवढीपण अक्कल नाही का???. " वेड्याला जोड्याचा मार अन शहाण्याला शब्दांचा मार द्यायचा असतो."
मी पुन्हा बोललो "महाराज हा आपला पुर्वीचा धनगर समाज नाही राहिला की ज्याला स्वाभिमानाची किंमत होती. आज या महाराष्ट्रातला तमाम धनगर समाज प्रस्थापितांच्या दावणीला बांधला गेलाय. महाराज आजचा धनगर समाज स्वाभिमानाची भाषाच विसरून गेलाय. जो धनगर समाज बांधव स्वतःचा स्वाभिमान दुसर्यांच्या बुटाखाली गहाण टाकतोय त्याला मी कसं जागं करू??? ज्या धनगर समाजाला आपला इतिहासच माहीत नाही ते काय इतिहास घडविणार???

महाराज एकाएकी कडाडले अरे आम्ही घडवलेला इतिहास जर  तुम्हाला आठवत नसेल तर तुम्ही धनगरांचे वारसदार कशासाठी म्हणवून घेता?? हाडाची काडं करून ते बहाद्दर लढले होते अन रक्ताचं पाटच्या पाट पाण्यासारखं वाहत होतं एवढं बलिदान नेमकं कोणासाठी होतं?? छातीची ढाल करून मनगटाच्या जोरावर लढलेल्या महापुरुषांची अन पुर्वजांनी सांडलेल्या रक्ताचीच जाणीव जर धनगर समाजाला नसेल तर या गोष्ठीची आपल्या पुर्वजांना देखिल लाज वाटत असेल की आरे आपण कोणत्या जातीत जन्माला आलो?? आणि याचा देखिल त्यांना खेद वाटत असेल"
महाराजांचे डोळे लालबुंद झाले होते महाराज जाम चिडले होते.
धनगर समाजानं ३५० वर्षं या हिंदुस्थानावर केलेलं राज्य मग आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्या पासून राजा बिंदुसार, राजा सम्राट अशोका ते राजे मल्हारराव होळकर, रणरागीणी अहिल्यामाई होळकर, शुरवीर राजे यशवंतराव होळकर तुकोजीराव होळकर विरांगणा भिमाई होळकर यांचा सुवर्णाक्षरात कोरलेला धनगर समाजाचा इतिहास ते माझ्यासमोर मांडत होते. तलवारीच्या जोरावर मिळवलेल्या यशाच्या गाथा गिरवत होते. स्वातंत्र्यासाठी लढणारे आद्यप्रणेते राजे यशवंतराव होळकरच होते, हे आम्हापासून लपवून ठेवलं गेलं आणि चुकीचा इतिहास लिहला गेला कारण इतिहासकारच जन्माला आले होते.
इंग्रजांनी भारतावर आक्रमण केलं होतं. अनेक संस्थानांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली होती, महाराज प्रत्येक संस्थानाच्या राजांना पत्र लिहून इंग्रजांविरूद्ध एकत्र लढण्याचे आवाहन करत होते. अख्खा हिंदुस्थान इंग्रजांपुढे झुकला गेला होता पण माझा राजा कोणापुढे न झुकता ताठ मानेनं कोरीव मिश्यांना ताव देत स्वाभिमानानं  जगत होता. सोळा लढायामध्ये इंग्रजांना पराभूत करत वायूवेगाने इंग्रजांच्या सैन्याना कापत सुटायचा, कधीकधी इंग्रज अधिकारी देखिल यशवंतराव होळकरांपुढे नतमस्तकी व्हायचे तर कधी काही इंग्रज अधिकारी रणांगणातून माघारी पळ काढायचे.
हीच ती धमक होती हाच त्यांचा शूरबाणा आणि मनगटाच्या जोरावर शत्रुंना चारीमुंड्या चीत करणारी त्यांची ती तलवार माझ्या मातीवर अत्याचार करणार्यांना कापत सुटायची.
महाराज बोलत होते मी मात्र सुन्न होऊन त्यांच्या शौर्यगाथा ऐकत होतो, एकाएकी अंगावर रोमांच उठायचे, अंग शहारून निघायचे माझ्याही मुठी आवळल्या जायच्या.
माझ्या ओठातून शब्द फुटले "महाराज मला आज्ञा द्या मी नेमकं काय करु??"
महाराज मला खडसावतच बोलले "आज प्रस्थापितांना जर धाक दावायचा असेल तर धनगर समाजाला जागं करावं लागेल, जे जागे आहेत त्यांना उठवून उभा कर,  त्यांना चालतं कर  बोलतं कर लेखणीरूपी धारदार  शब्दांच्या तलवारी प्रत्येकाच्या हातात दे की जे शब्द काळीजं चिरत जातील.
एखाद्या पिकाची मशागत करायची असेल तर अगोदर शेत नांगरावं लागतं तरच पिक जोमानं वाढतं त्याचप्रमाणे अगोदर धनगर समाजाचं डोकं नांगरलं तर भविष्यात धनगर समाजाला कोणाकडेही गहाण पडायची वेळ येणार नाही."
आज धनगर समाजातील काही दलाल धनगर समाजाला बळीचा बकरा बनवून प्रस्थापितांच्या दावणीला घेवून चाललेत. त्या दलालांना अन चमचेगिरी करणार्या नेत्यांना माझं सांगणं आहे की बाबांनो तुम्ही बुजुर्ग आहात तुम्हाला सर्व गोष्ठीचं ज्ञान आहे तुम्हाला जर माझ्या धनगर समाजाचं नेतृत्व करायचं असेल तर प्रस्थापितांचे बुट चाटायचे अन त्यांची गुलामगीरी चमचेगीरी करायचं सोडून द्या, त्या त्या पक्षाचा झेंडा पायदळी तुडवून त्यांचे राजीनामे द्या आणि तुम्हाला धनगर समाजावरती होणार्या अन्यायाचं भान असेल समाजाबद्दल तुम्हाला पुळका असेल तर एकत्र येवून लढा अन पिवळा झेंडा खांद्यावर घेवून चला मगच माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाचं नेतृत्व करा अन्यथा आजची सुशिक्षीत युवा पीढी तुमच्यासारख्या दलालांच्या तोडात शेण घातल्याशिवाय शांत बसणार नाय.
महाराज मी शपथ घेतोय की, "आज धनगर समाजाला जागं करून प्रत्येकाची डोकी नांगरल्याशिवाय नितीनराजे शांत बसणार नाय. मग तिथं मला कोणीही आडवा तर त्याला तिथंच उभा चिरणार अन जर कोणी हात जोडून आला तर त्याला लोटांगण घालणार.
कारण जर आमच्या वाटेला कोणी आला तर त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतनार नाय हा आमुचा इतिहास आहे."
जय मल्हार! जय अहिल्या!!
एक कट्टर धनगर
     -नितीनराजे
@ जागा हो धनगर
(+917666994123)
https://m2.facebook.com/jagaho.dhanagara आणि
(nitsanuse.blogspot.com)
यावरती आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात...

...धनगर आरक्षणाचं भीजत घोंगडं

आज काल राज्यभरातून मला कॉल्स येवू लागले. ठराविक कॉल काही कारणामुळे मी रिसीव्ह करु शकलो नाही. त्याबद्दल मी माफी मागतो पण ज्यांचे रिसीव्ह केले त्यातील भरपूर जनांनी माझ्याकडून लिहल्या गेलेल्या लेखांचे समर्थन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा सुद्दा दिल्या त्या सर्वांचा मी आभारी आहे, तर काहीजन कॉल करून लेख आवडल्याचे सांगत विनंती करु लागले की राजे हा १८ तारखेचा मोर्चा खूप महत्वाचा आहे.
मग माझी ट्यूबच पेटली की आरं जर १८ मार्च २०१५ चा मोर्चा खूप महत्वाचा वाटत असेल तर मग मागे पंढरपूर-बारामती आरक्षणासाठीची पदयात्रा काय मुर्ख म्हणून काढली होती का?? २१ जुलै पासून अमरण उपोषण करणारे समाजबांधव मुर्ख होते का?? जागो जागी चक्का जाम करुन प्रत्येक तहसिल कार्यालयावर मोर्चे काढले आंदोलने केली ती सर्व व्यर्थच का??? समाजकंटकावरती माझ्या वाघांनी शाई हल्ला केला पण त्यांच्यावरती अमाणूष अत्याचार केला गेला मग ते समाजासाठी लढणारे वाघ काय मुर्खच समजायचे का??? काहीजण आत्मदहनासाठी तयार झाले होते त्यांनाही मुर्खच समजायचं का?? मुंबई मध्ये देखिल १ अॉगस्ट रोजी चक्का जाम करत रेल्वे रोखो देखिल केला होता अनेक तरुणांना पोलीस कोठडी देखिल झाली मग तो आरक्षणासाठीचा संघर्ष काय मुर्ख म्हणून केला होता का?? एवढेच नव्हे तर या संघर्षामध्ये माझ्या धनगर समाजातील आई-बहिणी रस्त्यावर उतरल्या होत्या मग त्यापण मुर्खच होत्या का??? पाठीमागे विकास महात्मेंनी ४ जानेवारीला धनगर समाज मेळावा आयोजित केला होता मग धनगर समाजच मुर्ख म्हणायचा की धनगर समाजातील नेते???
मला समजावून सांगताय मोर्चा खूप महत्वाचा आहे मग तुम्ही मागच्या पंढरपूर-बारामती पदयात्रेत होता का??? जर मोर्चामध्ये सामील झाला असता तर आज बोलला नसता की १८ मार्चचा मोर्चा खूप महत्वाचा आहे म्हणून...
६० ते ७० समाजबांधव पंढरपूर मध्ये आरक्षण बाबतीत चर्चा करण्यासाठी एकत्र आले होते त्यातूनच बारामतीला पायी (पैदल) जाण्याचा निर्णय झाला मग लोकांनी हातात हात दिले, कोणालाच माहीत नव्हतं नेमकं आपल्याला करायचाय काय पण पंढरपूर वरतून निघालेली पदयात्रा बारामतीला पोहचेपर्यंत अनेक नेते आणि लाखो लोक एकत्र आले होते त्यावेळी जखमी झालेल्या वाघासारखा लाखोंचा पेटून उठलेला जनसागर शरद पवारांच्या बंगल्यासमोरून जात होता त्यावेळची अशी परिस्थीती  होती की पेटून उठलेले लोक काय करतील ते सांगता येत नव्हतं मग त्या पवारांच्या बंगल्याचं काय झालं असतं ??? तिथली सिक्योरिटी सुद्धा घामाघूम झाली होती याचा थोडा विचार करा पण ती परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी एकच वाघ त्या बंगल्यासमोर उभा होता म्हणून पेटून उठलेले, जखमी वाघासारखे चिडलेले लाखो लोक त्या वाघाकडं बघून फक्त घोषणाबाजी करत स्टेडियमच्या दिशेने निघून गेले अन्यथा मा.महादेवजी जानकर साहेब जर तिथं नसते तर त्या लाखो लोकांनी शरद पवारांचा बंगला पेटवून टाकला असता जमिनदोस्त केला असता. याची माहीती तुम्हाला असायला हवी मग १८ मार्च च्या मोर्चा बद्दल धनगर समाजाच्या चमच्यांची कानभरणी करणारे शरद पवार आज कुठे असते त्याचा अंदाज तुम्हीच लावा मग मला सांगा कोणता मोर्चा महत्वाचा आहे ते.
मी पदरचं बोलतोय किंवा माझ्या खिशातलं लिहतोय अशातला विषय नाही पण वास्तविकता काय आहे त्यावरती चर्चा करुन विचारविनीमय करावा.
काही समाजबांधवांनी मला विचारलं की समाजात दुमत झाले आहे ते असे की मोर्चामध्ये सामील व्हावे की नाही ???
खरंतर संभ्रमावस्था निर्माण झाली आहे की नेमकं करायचं तरी काय?? जरी नेत्यांनी राजीनामं दिलं तर मग जायचं कोणासोबत??? असं कोणतं नेतृत्व आहे की जे धनगर समाजाला तारु शकतं???
तर मग बांधवांनो शरद पवारांना जाऊन विचारा की राष्ट्रीय समाज पक्ष हा नक्की कोणता पक्ष आहे तर शरद पवार देखिल सांगतील की हा धनगरांचा पक्ष आहे. दुसरा प्रश्न त्यांना  विचारा की महादेवजी जानकर कोण आहेत तर ते कोणताही अवधि न डवडता बोलतील की महादेव जानकर हा धनगरांचा नेता आहे. मग तुम्ही-आम्ही कोणत्या रक्ताच्या औलादी आहोत याची जाणीव तुम्हा-आम्हाला नाही का???
आजपर्यंत आपल्या धनगर समाजाला एक सक्षम नेतृत्व नव्हते म्हणून धनगर समाजाची पिछेहाट झाली. पण जिथं प्रस्थापितच बोलू लागलेत की महादेव जानकर धनगर समाजाचा नेता आहे. तो फिर हम-तुम कौनसी मीठ्ठी के बने है।
१८ मार्चचा मोर्चा तुम्हाला यासाठी महत्वाचा वाटत असेल की धनगर समाजाला ST चं आरक्षण मिळो अथवा न मिळो त्याचं सारं श्रेय शरद पवारांच्या पदरात पडावं यासाठीच ना????
माझा हेतू आरक्षणाला विरोध करणं नव्हे तर एकसंघ होऊनच आरक्षण हिसकावून घेवू एवढाच हेतू आहे. यामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ काहीही नाही फक्त माझ्या भोळ्या-भाबड्या अन अज्ञान समाजाला आपल्या हक्काचं ST चं आरक्षण मिळायला हवं हीच माझी तळमळ आहे.
१८ मार्च ला हजारो समाजबांधव जीवाचं रान करून मोर्चात सहभागी होतील पण लक्षात ठेवा जे सत्ता असताना आरक्षण देवू शकले नाहीत उलट धनगर समाजाला ST चं आरक्षण मिळू नये म्हणून पिछड, मोघे आणि पुरके यांना धनगर समाजाविरोधात उभं ठाकण्यास प्रवृत्त करणारं बांडगुळ तुम्हाला काय आरक्षण देणार???
जानकर साहेबांनी आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला होता त्यामुळे जानकर साहेब हेच धनगर समाजाचे खरे नेते ठरले आणि आताही जर त्यांनीच हा मुद्दा लावून धरला तर महाराष्ट्राचं नेतृत्व धनगर समाजाकडं जाईल  आणि भविष्यात महादेव जानकर हाच एक बलाढ्य नेता तयार होईल मग मुठबर असलेल्या २००-३००  प्रस्थापित पवार पाटील देशमुख फडणवीस ठाकरेंना घरात बसावं लागल  या भीतीनंच शरद पवारांकडून १८ मार्च च्या मोर्चाची डाळ शिजवण्यात आली आहे आणि तुम्ही उतावळे बनून आरक्षणाची पोळी खायची या हेतूनं १८ तारखेला तोंड वर करून निघाला आहात पण तुम्हाला पोळी तर दूरची गोष्ठ आहे तिथं साधं शिजलेल्या डाळीचं कोळूनि सुद्धा तुम्हाला भेटणार नाही.
कारण,
धनगर समाजाला वर येवू द्यायचं नाही अन धनगरांना एकच नव्हे तर दोन दोन घोंगडी टाकून झोपवा असे सांगणार्या यशवंतराव चव्हाणांची राजकीय औलाद म्हणजे त्याचं नाव शरद पवार आहे मग प्रकाश शेंडगे, आण्णासाहेब डांगे, वडकुते, रुपनर, दत्ता मामा भरणे इ.ना मला विचारायचं आहे की तुम्ही बुजूर्ग आहात ज्ञानी आहात मग तुम्ही नक्की धनगर समाजासाठी काम करताय का धनगर समाजाच्या विरोधात????
जर धनगर समाजाचं काम करायचं असेल तर मग सक्षम, हुशार आणि जातिवंत धनगर असलेल्या नेत्यासोबत जाऊन आरक्षण हिसकावून घ्या नायतर मग तुमची अवस्था काय असेल हे मी सांगायची गरज पडणार नाही १८ तारखेला धनगर समाजच दाखवून देईन तुम्हाला....
आपलाच एक समाज बांधव
       - नितीनराजे
@ जागा हो धनगर
[+917666994123]
[Facebook.com/jagaho.dhangara]
[nitsanuse.blogspot.com]

Monday, 2 March 2015

आगोदर या प्रश्नांची उत्तरे द्या...

आरक्षणाचं नाव काढलं की मला भयंकार राग येतो. माझ्या तळपायाची आग मस्तकापर्यंत जाते.
अरे कोणासाठी आरक्षण पाहिजे?? कशासाठी पाहिजे?? याचे फायदे काय? सत्ताधारी लोकं आपल्याला आरक्षण का देत नाहीत?? आदीवाशी लोकं याला का विरोध करतात??
हे सर्वसामान्य धनगर बांधवांसाठी माझे प्रश्न आहेत. त्याव्यतिरीक्त धनगर समाजातील नेते आरक्षणासाठी आंदोलने मोर्चे का करताहेत?? जर त्यांना धनगर समाजाच्या आरक्षणासाठीच झटायचं आणि झगडायचं असेल तर ते एकत्रित का येत नाहीत?? प्रत्येकाच्या खाद्यावर वेगवेगळ्या पक्षाचा झेंडा कसा काय?? धनगर नावाची जमात एकच आहे की अनेक आहेत?? जर एकच धनगर समाज असेल तर मग नेते वेगवेगळे कसे काय?? धनगर समाजासाठी आणि आरक्षणासाठी लढायचं असेल तर समाजाचं विभाजन कशासाठी करताय??? या सर्वांची उत्तरं जर प्रत्येक समाजबांधवाला देता येतील त्यादिवशी आपण आरक्षणाचे मानकरी असणार हे मात्र निश्चित.
असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात थैमान घालून बसलेत. पण हे प्रश्नच ज्याच्या डोक्यात येत नाहीत त्यांना उत्तरं तर कोठून सापडणार??? हा देखिल सर्वात मोठा प्रश्न म्हणावा लागेल.
अरे आपल्या आया-बहीणी उन्हातान्हात थंडी वारा पाऊस यांचा विचार न करता माळरानावर डोंगर-दर्यातून दगड-धोंडे काटे-कुटे तुडवत आयुष्याशी झगडत होत्या आणि आजही तीच परिस्थिति आहे. तरीपण या सर्व गोष्ठींचा न करता त्याच आपल्या आया-बहिणी भर पावसात आरक्षणासाठी रस्त्यावरवर उतरल्या होत्या.
का झालं असं?? का आपल्या आया-बहिणींना देखिल संघर्ष करावा लागतोय??
मग आपण भिक मागतोय की आपल्या हक्काचं आरक्षण मागतोय हेच मला समजेना.
धनगर समाज आरक्षण कृती समितीमधील सर्वच नेत्यांना माझी एक चपराक आहे की आपल्या माझ्याच आया-बहिणी रस्त्यावर उतरल्या होत्या याची जाणीव तुम्हाला असून देखिल आज तुम्ही थंड का?? सत्ता मिळाल्यावर १० दिवसात आरक्षण देतो म्हणनार्या फडवणवीस ला ११ व्या दिवशी तुम्ही जाब विचारायला का गेला नाही?? आरक्षणासाठी रस्त्यावर उतललेल्यांपैकी त्यात तुमच्या कोणी आई-बहिणी नव्हत्या का? आणि जर त्या तुमच्या आई-बहिणी असतील तर आज तुम्ही एवढे षंढ कसे काय झालात??
४ जानेवारी २०१५ रोजी नागपुर मध्ये धनगर समाजाचा मेळावा आयोजित केला होता मग फडण२० ने सांगितले होते की एका महिण्यात निर्णय घेणार मग त्या फडणवीस ला तिथंच का नाही की अगोदर झकमारायला १० दिवस सांगितले होते का?? जर एका महिण्यात निर्णय घेणार होता तर ४ फेब्रुवारी रोजी एक महिना झाला उद्या ४ मार्च ला २ महिने होतील. अजून कीती महिने मोजत बसायचं??
पाठीमागे उपाशी-तापाशी राहून मोर्चे आंदोलने केली, उपोषणे केली होती ते सर्व वासरलात का तुम्ही?? आपल्या आई-बहिणी रस्त्यावर उतरून आरक्षणाची भिक मागत होत्या हे पण विसरलात का तुम्ही?? कीती निष्ठूर झालात तुम्ही?? आर या पार म्हणून आरक्षणासाठी अख्ख्या महाराष्ट्रातील धनगर समाज एकत्रित आला होता मग मधूनच कसे काय विझलात???? काय दाखवून दिलं नेमकं तुम्ही?? हे प्रश्न मी तुम्हा सर्व धनगर समाजातील नेत्यांना अन बांधवांना देखिल विचारतोय यामध्ये धनगर समाजाच्या कोणत्याही नेत्याला टार्गेट केले नाही अन त्यांना समजावयला ते लहान तान्ही बाळं नव्हेत.
उद्या पुढे भविष्यात कधीही धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कोणीही नेता नेतृत्व करेल पण त्या त्या नेत्यानं एकच गोष्ट लक्षात ठेवावी.
जर समाजाचं नेतृत्व करायचं असेल तर प्रस्थापित पवार पाटील ठाकरे फडणवीस याचे बुट चाटायचे सोडून द्या अर्थात त्यांची गुलामगीरी अन समाजाची दलाली चमचेगीरी बंद करुन तुम्ही कोणत्याही पक्षात काम करत असाल त्या त्या पक्षाला राजीनामा द्यावा. मग भाजप असो शिवसेना मनसे असो कोंग्रेस राष्ट्रवादी जनता दल, जन क्रांती असो अथवा शिवसंग्राम याव्यतिरीक्त छोट्या मोठ्या कोणत्याही संघटना असोत. त्या सर्व पक्षांना एक पत्रकार परिषद बोलावून तुम्ही राजीनामे द्या अन्यथा माझ्या धनगर समाजाचं नेतृत्व तुम्ही करू नका कारण तुम्ही त्या लायकीचे नसाल. आमच्या धनगर समाजातीलच तुम्ही औलादी असाल तर या ना एका पिवळ्या झेंड्याखाली मग महाराष्ट्च  काय दिल्ली हादरवून सोडतो.
आपलाच एक समाजबांधव
        नितीनराजे
@ जागा हो धनगर
 7666994123
जय मल्हार!! जय अहिल्या!!!